पुणे – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या 25 टक्के जागांसाठी (आरटीई) राज्यात एकदाच प्रवेशासाठी सोडत अर्थात लॉटरी काढण्यात येणार आहे. आरटीई प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 1 फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी एक महिना मुदत देण्यात आली आहे.
शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आरटीई प्रवेशाच्या वेळापत्रकाची माहिती ट्विट करीत दिली. त्यानुसार दि.28 डिसेंबरपासून आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू होईल. याच तारखेपासून ते 17 जानेवारीपर्यंत प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या शाळांची पुन्हा तपासणी करण्यात येईल. त्यानंतर प्रवेशासाठी दि. 1 ते 28 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी कालावधी आहे. दि. 8 व 9 मार्च रोजी लॉटरी काढली जाईल.
लॉटरीद्वारे प्रवेश मिळालेल्या निवड यादीतील पालकांनी दि. 10 ते 31 मार्चदरम्यान शाळेत जाऊन कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे आणि आपला तात्पुरता प्रवेश निश्चित करावा, असेही वेळापत्रकात स्पष्ट करण्यात आले. राज्यात यंदाही एकदाच लॉटरी काढण्यात येणार आहे. शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे. एकूण चार प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार असून, त्याच्या तारखाही प्रसिद्ध करण्यात आले आहे. 1 एप्रिल ते 9 मे या कालावधीत प्रतीक्षा यादीसाठी कालावधी निश्चित केला आहे.