महापालिकेचा निर्णय, आयुक्तांचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश पुणे : कामावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तत्काळ ५ लाखांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी कामगार कल्याण विभागास दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी महापालिकेतील तीन कर्मचाऱ्यांना हृदयरोगाचा झटका आला. त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून दोन कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. ही माहिती मिळताच आयुक्तांनी तातडीने मदत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या महापालिकेकडून कामावर असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास ७५ हजारांची मदत दिली जाते. महापालिकेचे १८ हजार कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी महापालिकेकडून सामूहिक अपघात विमा उतरविला आहे. अपघात अथवा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, नैसर्गिक मृत्यू झाल्यास मदत देण्याची कोणतीही तरतूद नसल्याने अशा प्रसंगी कुटुंबियांना मदत करणे शक्य होत नाही. त्यामुळे भविष्यात असे प्रकार घडल्यास कुटुंबियांना तत्काळ मदत मिळावी, या उद्देशाने पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. कार्डिॲक कक्ष महापालिकेच्या मुख्य इमारतीत दररोज सुमारे तीन हजार कर्मचारी काम करतात. तसेच हजारो नागरिक विविध कामांसाठी येतात. अशा वेळी एखाद्या नागरिकास तातडीची वैद्यकीय मदत आवश्यक ठरल्यास पालिकेच्या मुख्य इमारतीत कार्डिॲक रुग्णवाहिका उपलब्ध आहे. मात्र त्या रुग्णवाहिकेत प्रथमोपचारासाठी डॉक्टर नसतात. दोन दिवसांपूर्वी दोन कर्मचाऱ्यांना हृदयरोगाचा झटका आल्यावरही तेथे डॉक्टर नव्हते. त्यामुळे पथ विभागाचे शिपाई अशोक वाळके यांचा मृत्यू झाला तर, वरिष्ठ लिपिक छाया सुर्यवंशी यांच्यासह, आरोग्य निरिक्षक राहूल शेळके यांच्यावर वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मुख्य इमारतीत कार्डिॲक कक्ष उभारला जाणार असून त्या ठिकाणी एक स्वतंत्र डॉक्टर नियुक्त केला जाईल.