पुणे : धायरी येथील सराफी दुकानात खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून एका सराफी पेठीवर दरोडा टाकण्यात आला. येथून तब्बल २५ ते ३० तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ३५ लाख रुपये आहे. याप्रकरणी नोंदडे सिटी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची पथके तपासासाठी रवाना झाली आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विष्णू सखाराम दहिवाल यांचे धायरीतील रायकर मळा येथील काळुबाई चौकात श्री सराफ नावाची पेठी आहे. दुपारी पावणे तीनच्या सुमारास ते कामगारासह पेठीवर होते. तेव्हा एक व्यक्ती सोन्याची चेन दाखवा म्हणून दुकानात आली. त्याच्या पाठोपाठ आणखी दोन व्यक्ती दुकानात आल्या, त्यांनी हातातील पिस्तूल दाखवून धमकी देत सोन्याचे ३० तोळे वजनाचे दागिने जबरदस्ती करीत चोरले. दुकान मालकाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना हाताने आणि पिस्तुलच्या दांड्याने मारहाण करण्यात आली. यानंतर तीघेही आरोपी दुचाकीवरुन पळून गेले. दुकानमालकाने तातडीने पोलिसांना खबर दिली. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा त्यांना पिस्तुलचा दांडा मिळाला. त्यावरुन हे पिस्तूल खेळण्यातले असल्याचे निष्पन्न झाले. परिसरातील सीसीटीव्ही आरोपी दुचाकीवरुन जाताना दिसून येत आहेत. मागे बसलेल्या व्यक्तीच्या पाठिवर एक सॅकही दिसत आहे. तिन्ही आरोपींचे वय २५ ते ३५ दरम्यान होते. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.