पुणे -शहरातील रस्त्यांची पावसाळ्यात होणारी दुरवस्था टाळण्यासाठी आता महापालिकेकडून रस्त्यांची पावसाळापूर्व तपासणी “बेन्कलमन बीम’ यंत्रणेचा वापर करून करण्यात येणार आहे. दरवर्षी पालिकेच्या अभियंत्याकडून रस्त्यांची पाहणी केली जाते. त्यांच्या अहवालानुसार रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी सुमारे 50 ते 55 कोटींचा खर्च केला जातो. त्यानंतरही रस्ते पावसाळ्यात उखडतच असल्याने हे पैसे वाया जातात. त्यामुळे हे प्रकार टाकण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते तपासणी केली जाणार आहे. यात यंत्रांचा वापर करून रस्त्याची सद्यस्थिती तपासून, किती जाडीचा डांबराचा थर टाकायचा, याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर कामापूर्वीची स्थिती आणि नंतरची स्थिती याची पडताळणीही यांत्रिक पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी दिली. हे वापरले जाणार तंत्रज्ञान फॉलिंग वेट डिप्लेक्टोमीटर (एफडब्ल्यूडी) या नवीन पद्धतीच्या रस्ते तपासणी यंत्राचा वापर केला जाणार आहे. या एफडब्ल्यूडी यंत्राद्वारे डांबरी रस्त्याची सध्याची स्थिती, क्षमता तसेच वापरलेल्या थराची क्षमता तपासून त्यावर नव्याने डांबराचा थर किती जाडीचा टाकायचा हे ठरवले जाते. तसेच रस्त्याच्या उर्वरित आयुर्मानाचाही अंदाज बांधता येतो. याचबरोबर संबंधित रस्त्यावरून वाहन चालविण्याची क्षमता (राइड क्वालिटी) तपासण्यासाठी बंप इंटिग्रेटर या यंत्रणेचा वापर करून रस्त्याची कामापूर्वीची स्थिती आणि कामानंतरची स्थिती याची सांगड घातली जाणार आहे. भारतीय रस्ते कॉंग्रेस (आयआरसी) च्या मानांकनानुसार रस्त्याचा दर्जा राखणे यामुळे शक्य होणार आहे. तर कॉंक्रिटचे रस्ते करताना व्हाइट टॉपिंगसाठी आयआरसीनुसार बेन्कलमन बीम यंत्रणेचा वापर करून रस्त्याची वाहन क्षमता तपासण्यात येणार आहे.