Pune : रिंगरोडच्या आराखडयात अशंत: बदल करावा : मानकर

पुणे : रिंगरोड प्रकल्पबाधित शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रिंगारोडच्या विकास आराखड्यात बदल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काॅग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली केली आहे. या बाबतचे निवेदन मानकर यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, रस्ते विकास महामंडळ तसेच पीएमआरडीए आयुक्तांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत १३७ किलोमीटर लांबीचा पुणे रिंगरोड प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, त्याबाबतचा विकास आराखडा तयार होत आहे. रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली असून, कॉरिडॉरच्या बाजूने दोन प्रमुख विकास केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.
या रिंगरोड प्रकल्पामध्ये ग्रामीण भागातील अनेकांच्या रोजगारामध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. गावातील ग्रामस्थांना जमीन संपादित केल्यामुळे दुसरीकडे स्थलांतरित व्हावे लागत आहे. त्यांचा स्वतःचा असलेला व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे रिंग रोडच्या कामांमध्ये स्थानिक युवा व्यावसायिक, नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे. जेणेकरून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा, स्थानिक नागरिकांचा निर्माण झालेला रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकेल.
तसेच पुणे रिंगरोड प्रकल्पबाधित शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विकास आराखड्यात बदल करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल इशाराही मानकर यांंनी आपल्या निवेदनात दिला आहे.





