पुणे – रेल्वे स्टेशनवर काही गुंड प्रवृत्तीचे रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे मागून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी काही रिक्षाचालक आणि प्रवाशांनी थेट पोलीस आयुक्तांकडेच केल्या. या तक्रारीची तात्काळ दखल घेत आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी स्वतः स्टेशन परिसराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी प्रामाणिक रिक्षाचालक आणि प्रवाशांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या वेळी स्टेशन परिसरात ठराविक वीस ते तीस गुंड प्रवृत्तीचे तथाकथित रिक्षाचालक असून, त्यांच्या दहशतीमुळे मीटरने व्यवसाय करणारे प्रामाणिक रिक्षाचालक येथे येणे टाळतात. त्यामुळे प्रवाशांना अव्वाच्या सव्वा दरामध्ये रिक्षा घ्यावी लागते, अशी तक्रार रिक्षाचालकांनी केली. या वेळी महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर, तसेच प्रीपेड रिक्षा बूथवर काम करणारे अनेक रिक्षाचालक उपस्थित होते. उपायुक्त जाधव यांनी या बाबींची नोंद घेत पुढील कार्यवाहीचे आश्वासन दिले.