पुणे – करोना कालावधीत वाहन खरेदी करण्याचे प्रमाण घटले होते. पण, 2022-23 मध्ये शहरात वाहन खरेदी वाढली आहे. या आर्थिक वर्षांत 2 लाख 92 हजार नवीन वाहनांची खरेदी झाली आहे. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी 1 लाख 21 हजारांनी वाढ झाल्याचे दिसून आले.
पुणे हे दुचाकीचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात सध्या 35 लाख वाहने आहेत. यामध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2020 मध्ये करोना कालावधीत वाहन खरेदीला ब्रेक लागला होता. या कालावधीत वाहन खरेदीचे प्रमाण 37 टक्क्यांनी घटले होते. 2022 मध्ये सर्व निर्बंध उठल्यानंतर
पुन्हा वाहन खरेदी वाढली आहे. शहरात (पुणे प्रादेशिक परिवहन विभाग) करोना पूर्वी 2019 मध्ये दोन लाख 40 हजार वाहनांची विक्री झाली. 2020 मध्ये दोन लाख 55 हजार 925 तसेच 2021 मध्ये तुलनेत 50 टक्क्यांनी वाहन खेरदी वाढली. सन 2023 च्या पहिल्या तीन महिन्यांतच 36 हजार 334 वाहनांची विक्री झाली आहे. वाहन खरेदी वाढल्यामुळे आरटीओच्या महसुलामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.