पुणे : भाडेतत्वावर घेतलेले उपहारगृह सोडण्यास सांगितल्याने एका उपाहारगृहचालकाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. उपाहारगृहचालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महेश साखरे (वय ४२, रा. महादेवनगर, मांजरी) असे आत्महत्या केलेल्या उपाहारगृहचालकाचे नाव आहे. याबाबत साखरे यांची पत्नी दीपाली (वय ३८) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश भालचंद्र घुले (वय ५०), रोहिणी संदीप तुपे (वय ४९), प्रशांत पुजारी (वय ३५), निलेश उत्तम घाडगे (वय ३२), सचिन जयराम शिंदे (वय ४५, सर्व रा. मांजरी) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश साखरे यांनी मांजरी भागात उपहारगृह सुरू केले होते. उपहारगृह सुरू करण्यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते, तसेच काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले हाेते. उपहारगृह सुरू करण्यापूर्वी त्यांनी आरोपींसोबत करार केला होता. कराराची मुदत संपण्यापूर्वी आरोपींनी त्यांना उपहारगृहाचा ताबा सोडण्यास सांगितले. पैसे परत करण्यासाठी त्यांनी तगादा लावला होता. त्यांच्या त्रासामुळे महेश यांनी १० मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपींच्या त्रासामुळे पतीने आत्महत्या केल्याचे दीपाली साखरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.