पुणे -सणासुदीच्या दिवसात शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी पोलिसांकडून या कोंडीवर उपाय म्हणून शहरातील मुख्य वर्दळीचे रस्तेच बंद करण्याचा “प्रताप’ केला जात आहे. अशाच प्रकारे मंगळवारी अंगारक चतुर्थीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला भाविक दर्शनासाठी गर्दी करतील म्हणून पोलिसांनी शिवाजी रस्ता तसेच बाजीराव रस्ता बंद केला होता. त्यामुळे पुणेकरांना मंगळवारी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या कोंडीत अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही अडकून पडल्या. या कोंडीमुळे तसेच रस्ते बंद केल्यामुळे अनेक व्यावसायिकांवर दुकाने बंद ठेवण्याची वेळ आल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले. यावर कडी म्हणजे रस्ते बंद केल्यानंतर आवश्यक फौजफाटा वाहतूक नियंत्रणासाठी देण्याचा विसर पोलिसांना पडला. डोळ्यासमोर कोंडी असतानाही काही पोलीस मात्र चक्क ऑनलाइन पावत्या करण्यात दंग होते. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे हेच रस्ते बंद केल्याने पुणेकरांना कोंडीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पुन्हा तिच स्थिती आज उद्भवली. केवळ रस्ते बंद करण्याचे नियोजन सकाळपासूनच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होणार असल्याचे कारण देत पोलिसांकडून दुपारपासूनच शनिवारवाड्यापासूनच स्वारगेटकडे जाणारा शिवाजी रस्ता बंद केला होता. तर बाजीराव रस्ताही पूरम चौकात बंद करून वाहतूक टिळक रस्त्याने डेक्कनकडे वळविण्यात आली होती. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या टिळक रस्त्यावर वाहतुकीचा ताण येणार होता. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला या दिवसापुरते पार्किंग बंद करणे आवश्यक होते. तर या दोन्ही रस्ताच्या बाजूने जाणारे रस्ते येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांसाठी वळविणे आवश्यक आहे. मात्र, तसे कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. परिणामी सकाळपासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी काही प्रमाणात वाहतूक सुरळीत राहिली. मात्र, पुन्हा कार्यालयीन वेळा तसेच शाळा सुटण्याच्या वेळानंतर कोंडी वाढण्यास सुरुवात झाली. केवळ हे दोन रस्ते बंद केल्याने पुणे स्टेशन, स्वारगेट, विद्यापीठ रस्ता, कर्वे रस्ता, शास्त्री रस्ता, मध्यवर्ती पेठांमधील जवळपास सर्वच रस्ते वाहतूक कोंडीत अडकले होते. पोलीसही हतबल हे रस्ते बंद केल्यानंतर कोंडी होणार, हे अपेक्षित होते. त्यामुळे संपूर्ण दिवसभर कोंडी टाळयासाठी या रस्त्याला पर्यायी असलेले रस्ते तसेच चौकांमध्ये पोलिसांची संख्या अधिक ठेवणे गरजेचे होते. मात्र, प्रत्येक ठिकाणी केवळ एक दोन कर्मचारी नेमण्यात आले. तसेच दुसऱ्या बाजूला कोंडी वाढत गेल्याने सिग्नल यंत्रणाही कोलमडल्याने ती बंद करण्यात आली. परिणामी अनेक चौकांत पोलिसांनी स्वतः वाहतुकीचे नियमन केले. मात्र, रस्ते बंद असल्याने असेच सर्वच बाजूचे रस्ते कोंडीत असल्याने वाहतूक नियमनात अडकलेले पोलीस कारवाई करणार नाहीत हे दिसताच अनेकांनी लहान गल्ली बोळात वाहने घातली तर अनेकांनी रस्त्यांच्या विरुद्ध दिशेने वाहने घातली. त्यामुळे कोंडीत भर पडली तर अशा कोंडी करणाऱ्या वाहनांना बाजूला करता करता पोलिसांची दमछाक उडाल्याने पोलीसही हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मंगळवारी दिवसभरात सुमारे तीन ते चार लाख भाविकांनी गर्दी केली होती. वाहनातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी होती. यामुळे शिवाजी रस्ता सकाळपासून जड वाहनांस बंद करण्यात आला होता. तर छोट्या वाहनांसही दुपारी एक नंतर बंद करण्यात आला. याचा परिणाम इतर रस्त्यावरील वाहतूक कोंडीत झाला. गल्ली बोळातील रस्तेही वाहतूक कोंडीने जाम झाले होते. आम्ही खडक, विश्रामबाग, फरासखाना, डेक्कन, चतुश्रृंगी आणि बंडगार्डन वाहतूक विभागातील सुमारे 300 ते 400 कर्मचारी ठिकठिकाणी कोंडी सोडविण्यास कार्यरत ठेवले होते. – विजयकुमार मगर, उपायुक्त, वाहतूक शाखा