प्रभात वृत्तसेवा पुणे – तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी अखेर आज मतदान होत असून, तब्बल ३५ लाख ५१ हजार ४६९ मतदान आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १६३ जागांसाठी तब्बल ११५३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून ४०११ मतदान केंद्रे निश्चित केली असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. शहरात सुमारे ९०६ संवेदनशील मतदान केंद्रे असून, संपूर्ण शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व केंद्रांसाठी साहित्य वाटपाचे कामही पूर्ण झाले आहे. २०१७ च्या निवडणुकीत पुण्यात ५५ टक्के मतदान झाले होते. हा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनास विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.महापालिकेची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली होती. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाची सुनावणी सुरू असल्याने या निवडणुका तीन वर्षांपासून रखडल्या होत्या. मात्र, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सुनावणीत या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज मतदान होत आहे. पुण्यात चार सदस्यांचा प्रभाग असून, ४१ प्रभागांमधील १६५ जागांसाठी ही निवडणूक आहे. मात्र, प्रभाग ३५ मधील दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने १६३ जागांसाठी ही मतदान प्रक्रिया होणार आहे. तीन लाख दुबार मतदार महापालिका निवडणुकीसाठी तब्बल तीन लाख ४४६ दुबार मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या दुबार मतदारांच्या नावासमोर स्टार करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही या मतदारांची संख्या लक्षणीय प्रमाणात असल्याने हे मतदान रोखणे महापालिका प्रशासनापुढील मोठे आव्हान असणार आहे. दुसरीकडे मतदार याद्यांच्या विभाजनातही मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने अनेक मतदारांची नावे गायब आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच विधानसभेला एका मतदान केंद्रावर सुमारे १२०० ते १४०० मतदार होते. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी ही मतदारसंख्या ८०० ते ९०० असणार असल्याने अनेक मतदारांची केंद्रे बदलली असल्याने त्यांच्यातही गोंधळ आहे. प्रशासन ८५ टक्के वोटर स्लिपचे वाटप झाल्याचा दावा करत आहे. अशी आहे मतदारांची स्थिती – एकूण मतदार : ३५ लाख ५१ हजार ८८४ – पुरुष : १८ लाख ३२ हजार ४४९ – महिला मतदार : १७ लाख १९ हजार ०१७ – इतर मतदार : ४४८