प्रभात वृत्तसेवा पुणे – धुक्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण वाढले असून नागरिकांन आरोग्याविषयी योग्य काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यविभागातर्फे करण्यात आले आहे.पावसाच्या प्रदीर्घ उपस्थितीनंतर रखडलेली रस्त्यांची, इमारतींची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण खूप जास्त आहे. धुक्यांंमध्ये धुलीकण अडकल्याने ते हवेच्या खालच्या स्तरावरच अडकले आहेत. त्यामुळे हवेच्या खालच्या स्तरावरच धुळीची झालर पसरली आहे.पुण्यात दिवसाचे तापमान २८ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. दिवसा ते वाढत असले तरी रात्री ते आणखी खाली येते. सकाळी मात्र धुक्याची झालर पसरलेली असते. त्यात बांधकाम, रस्ते खोदाई आणि इमारतींच्या वेगाने चाललेल्या कामांमुळे निर्माण झालेले धुलीकण धुक्यात अडकत आहेत. यामध्ये काँक्रीट मिक्सर प्रकल्पही वेगाने सुरू असल्यामुळे तेथूनही निर्माण झालेली धूळ हवेत पसरत आहे. त्यामुळे उपनगरांमध्येही हवेत धुके आणि धुळीची चादर पसरलेली दिसते. यामुळे हिंजवडी येथे सुरू असलेल्या ११ बांधकामाच्या ठिकाणचे आरएमसी प्लॅन्ट बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. याशिवाय थंडीही वाढली असून पाच डिसेंबरपर्यंत उत्तरेकडून येणारे वाऱ्यांमुळे वातावरणात आणखी थंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात आणि मध्य प्रदेशातही थंडीची लाट येईल. महाराष्ट्रात पारा एका अंकापर्यंत कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यामुळे खोकला, सर्दी, ताप, घशातील संसर्ग असे प्रकार होत आहेत. याशिवाय दमा आणि अन्य श्वसनरोग असलेल्या रुग्णांनाही याचा त्रास होत आहे. अशा रुग्णांनी मास्कचा वापर करावा, जास्तीतजास्त गरम गोष्टी खाव्यात, थंड पदार्थ खाणे टाळावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.