पुणे -शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजीनगर करावे. यासह रेल्वेशी संबंधित समस्यांचा पाढा सल्लागार समिती सदस्यांनी विभागीय व्यवस्थापक व रेल्वे अधिकाऱ्यांसमोर वाचला. यावेळी बैठकीत खडाजंगी झाली.
रेल्वे सल्लागार समितीची बैठक गुरूवारी दुपारी 11.30 ते 3 दरम्यान मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या मुख्यालयात झाली. यावेळी पुणे विभागाच्या मुख्य व्यवस्थापक इंदुराणी दुबे, अतिरिक्त व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग, वाणिज्य व्यवस्थापक मिलिंद हिरवे, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निखील काची, संदीप बुटाला, सुरेश माने, बशीर सुतार आणि इतर आठ सदस्य उपस्थित होते.
बैठकीत सदस्यांनी “प्रवाशांशी संबंधित प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. समितीच्या बैठका नियमित होत नाहीत,’ असे म्हणातच शाब्दिक वाद झाले. यावेळी विविध मागण्या देखील करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने पार्किंगमध्ये होणारी लुट, रेल्वे स्थानकावरील लिफ्टची सुविधा आणि अपुरा पाणीपुरवठा याविषयांवर विचारले असता, “पार्किंगमध्ये प्रवाशांची लूट नाही. याबाबत प्रशासन चौकशी करून पार्किंगचालक दोषी आढळल्यास त्यांना समज दिली जाईल आणि तरी देखील प्रवाशांची लूट होत असेल तर त्यांचा ठेका रद्द केला जाईल,’ असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पुढील सहा महिन्यांत पुणे स्टेशनमध्ये लिफ्ट बसविण्यात येणार आहे. यासाठी 10 कोटी 96 लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच इतर सदस्यांनी महिला स्वच्छतागृह, सीसीटीव्ही आणि रेल्वे स्थानकांची स्वच्छता विषयांवर अधिकाऱ्यांना जाब विचारला.
शिवाजीनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदल्याची मागणी केली. यासाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, केंद्रीय गृहमंत्रालय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवणार आहोत.
– निखील काची, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती