पुणे – खांब काढले मात्र, वीजवाहिन्या तशाच

सिंहगड रस्त्यावरील धक्‍कादायक प्रकार

पुणे – महापालिकेच्या पथदिव्यांना “अर्थिंग’ दिलेले नसल्याने शहरात गेल्या काही वर्षांत विजेचा धक्का बसण्यासह शॉक बसून जीव गेल्याच्या घटना सुरू आहेत. असे चित्र असतानाच सिंहगड रस्ता परिसरात पु.ल. देशपांडे उद्यानालगतच्या पदपथावर पथदिव्यांचे खांब हटविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी चक्क वीजजोड धोकादायकरित्या उघड्यावर सोडण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांत गरज नसतानाही मोठ्या प्रमाणात पथदिवे उभारण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सिंहगड रस्त्यावरही रस्त्याच्या दोन्ही बाजूला चांगल्या स्थितीतील पथदिवे असताना ते काढून रस्ता दुभाजकावर नवीन पथदिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे नवीन पथदिवे लावल्यानंतर जुने काढण्याचे काम सुरू आहे. अशाच प्रकारे काही पथदिवे काढल्यानंतर त्या ठिकाणी असलेले विद्युत जोड चक्क उघड्यावर सोडण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणी उद्यान असल्याने या पदपथावरून मोठी वर्दळ असते. तसेच शेजारी वस्ती असल्याने मोठया प्रमाणात नागरिक ये-जा करतात. अशा स्थितीत ही वीजजोड उघडी ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असला, तरी विद्युत विभागाकडून मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.