दोन आठवड्यांत २४ हजार मिळकतधारकडून कर जमा पुणे : मिळकतकर वसुलीसाठी महापालिकेने राबवलेल्या अभय योजनेच्या पहिल्या १५ दिवसात पालिकेच्या तिजोरीत तब्बल १२५ कोटी रूपये जमा झाले आहेत. ४ लाख ५० हजार थकबाकीदारांमधील २४ हजार मिळकतधारकांनी हा कर जमा केला आहे. त्यामुळे पालिकेचे मिळकतकर उत्पन्न सुमारे १९०३ कोटी झाले आहे. योजनेच्या सुरूवाती प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने त्यात बदल केला. पालिकेची मिळकतकराची थकबाकी १३ हजार कोटींच्यावर गेली असून नोटिसा बजावून, मिळकती जप्त करून त्याचा लिलाव करण्याचे कडक धोरण पालिकेने राबविले आहे. त्यानंतरही अनेक थकबाकीधारक कर भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे अभय योजना जाहीर केली. त्यानुसार १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारीमध्ये थकबाकी भरणाऱ्या मिळकतधारकांना थकबाकीवरील दंडाच्या रकमेवर ७५ टक्के सवलत आहे. या योजनेतून पालिकेने २०१६ नंतर राबविलेल्या अभय योजनेच्या लाभार्थींना वगळले होते. मात्र, राजकीय दबाव आणि निवडणूकांच्या तोंडावर वाद नको म्हणून प्रशासनाने नंतर ही योजना सरसकट राबविली. त्यातून मागील पंधरा दिवसात १२५ कोटींचा महसूल मिळाला आहे. पालिका अभय योजना राबवित असताना नियमित मिळकतकर भरणाऱ्यांनी २०२५-२६ चा कर भरलेला नाही. त्यांनी कर जमा करावा यासाठी पुढील महिन्यापासून पालिका त्यांना नोटीसा देण्यात येणार आहेत. तसेच वसुलीसाठी स्वतंत्र पथके तयार करून वसुलीवर भर देणार आहे. कर संकलन विभागास ३३०० कोटींच्या वसुलीचे उद्दीष्ट दिले असले तरी महसूल मिळत नसल्याने अभय योजना राबवावी लागली आहे.