पुणे – नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्तनोंदणी प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाल्याने सोमवारी (दि.18) आणि मंगळवारी (दि.19) या दोन दिवशी दस्तनोंदणीचे काम संथगतीने सुरू होते, अशी माहिती कन्व्हेन्सिंग प्रॅक्टिशनर असोसिएशनने दिली. नोंदणी व मुद्रांक विभागाने दि. 15, 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी नोंदणी विभागाचा सर्व्हर आवश्यक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवला होता. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील दस्त नोंदणीची प्रक्रिया, तसेच नोंदणी विभागाच्या सर्व ऑनलाइन सेवा बंद राहिल्या. या देखभालीनंतर दि. 18 ऑगस्टपासून सर्व सेवा नियमित सुरू होतील, अशी अपेक्षा नागरिक, वकील, दस्त लेखनकार व नोंदणी कार्यालयांना होती. मात्र, प्रत्यक्षात सोमवारपासून सर्व्हर अत्यंत संथगतीने सुरू झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे दस्तनोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात विलंब झाला. याशिवाय दस्त हाताळणी शुल्क भरणे, डाटा एन्ट्री करणे, ऑनलाइन पडताळणी व इतर पूरक सेवा जवळजवळ ठप्प झाल्या होत्या. मंगळवारीही परिस्थितीत विशेष सुधारणा झाली नाही. सर्व्हर अजूनही अत्यंत संथगतीने कार्यरत असून, ऑनलाइन सेवा सुरळीत झालेल्या नाहीत. परिणामी नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली, अशी माहिती कन्व्हेन्सिंग प्रॅक्टिशनर अससोसिएशनने दिली आहे. नोंदणी विभागाने त्वरित व परिणामकारक तांत्रिक उपाययोजना करून सर्व्हर व ऑनलाइन सेवा सुरळीत कराव्यात, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.