पुणे – पुण्यात होणाऱ्या जी-20 परिषदेच्या बैठकीसाठी येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या स्वागतासाठी लोहगाव विमानतळदेखील सज्ज झाले आहे. विविध देशांचे 100 पेक्षा अधिक प्रतिनिधी पुण्यात येणार असून, त्यांच्यासाठी विमानतळवर “रेड कार्पेट’ टाकले जाणार आहे. बाहेर आल्यानंतर त्यांचे स्वागत तुतारी, ढोल ही पारंपारिक वाद्य वाजवून केले जाणार आहे. भारताला यावर्षी जी-20 परिषदेचे यजमानपद मिळाल्यानंतर त्याच्या काही बैठका पुण्यात होणार आहे. त्यासाठी विविध देशाचे 100 पेक्षा जास्त प्रतिनिधी वेगवेगळ्या विमानाने पुण्यात येणार आहेत. त्यापैकी काही प्रतिनिधी दि. 13, 14 आणि 15 जानेवारीला येणार आहेत. त्यानुसार लोहगाव विमानतळाकडून स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. येणाऱ्या पाहुण्यासाठी विमानापासून “रेड कार्पेट’ टाकले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले जाईल. पुण्याशी संबंधित एखादी वस्तू भेट देऊन पाहुण्यांचे स्वागत केले जाईल. त्यानंतर पाहुण्यांचा पाहूचार करून त्यांना मल्टिलेवल पार्किंग येथे घेऊन जात तेथून परिषदेच्या ठिकाणी जाण्याची सोय केली जाईल. पाहुणे विमानतळाबाहेर पडल्यानंतर त्यांचे तुतारी व ढोल अशी पारंपारिक वाद्य वाजवून स्वागत केले जाणार आहे. स्वागताबरोबरच पाहुण्यांना परत जाण्यासाठी विमानतळ प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.