पुणे : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी तब्बल २८८६ अर्जांची विक्री झाली. मात्र, पहिल्याच दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नसल्याची माहिती महापालिकेने दिली. ४१ प्रभागातील १६५ जागांसाठी निवडणूक होणार असून, त्यासाठी १५ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये स्थापन झाली आहेत. या कार्यालयांकडून मंगळवारी अर्जांची विक्री झाली. नामनिर्देशन अर्जांची सर्वाधिक विक्री कसबा–विश्रामबागवाडा निवडणूक कार्यालयातून झाली असून तेथे ३०० अर्ज विकले गेले. सर्वात कमी विक्री कोंढवा–येवलेवाडी कार्यालयातून झाली असून तेथे केवळ ५१ अर्जांची विक्री झाली आहे. येरवडा–कळस–धानोरी आणि नगर रोड–वडगाव शेरी कार्यालयातून प्रत्येकी १९५, कोथरूड–बावधनमधून १९४, औंध–बाणेरमधून ७३, शिवाजीनगर–घोले रोडमधून २७५, कै. बा. स. ढोले पाटील रस्ता कार्यालयातून १७५, हडपसर–मुंढवामधून १९९, वानवडी–रामटेकडीमधून १९९, बिबवेवाडीमधून २२१, भवानी पेठमधून १९१, वारजे–कर्वेनगरमधून २२१, सिंहगड रोडमधून १९७ आणि धनकवडी–सहकारनगर कार्यालयातून २०० नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली आहे. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका हद्दीत विविध पथके कार्यान्वित केली आहेत. निवडणूक प्रक्रिया मुक्त, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने काटेकोर उपाययोजना केल्या आहेत. महापालिकेकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी २४६५ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील १ हजार हून अधिक ना हरकत प्रमाणपत्र तयार असून उमेदवारांना ते ऑनलाईन उपलब्ध आहेत. महापालिकेने या वर्षी या ना हरकत प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन सुविधा उपलब्ध केलेली आहे.