पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे चालणाऱ्या पत्रकारिता प्रगत अभ्यासक्रमांसाठी ३१ मे रोजी ऑफलाईन प्रवेश परीक्षा होणार असून त्यासाठी २७ मे पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. सकाळी पत्रकारिता प्रगत अभ्यासक्रम (ॲडव्हान्स कोर्स इन जर्नलिझम) व सायंकाळी डिजिटल मीडिया प्रगत अभ्यासक्रम (ॲडव्हान्स कोर्स इन डिजिटल मीडिया) हे अभ्यासक्रम चालविले जातात. त्याचा कालावधी एक वर्ष असून अभ्यासक्रम रानडे इन्स्टिट्यूटच्या आवारात शिकविले जातात. पत्रकारितेसाठी ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ तर डिजिटल मीडियासाठी दुपारी २ ते ५ या वेळेत लेखी प्रवेश परीक्षा होईल. या अभ्यासक्रमांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागप्रमुख डॉ. संजय तांबट यांनी केले आहे.