Pune : मस्तानी तलावाची सुरक्षा रामभरोसे

फुरसुंगी – निसर्गरम्य दिवे घाटाच्या कुशीतल ऐतिहासिक पेशवकालीन मस्तानी तलाव पावसाने काठोकाठ भरला आहे. त्यामुळे पर्यटक, इतिहास प्रेमींची तलावावरील वर्दळ वाढली आहे. वर्दळ वाढली असली तरी तलावाची सुरक्षा, स्वच्छता सध्या रामभरोसेच असल्याचे दिसते.
दोन महिन्यांतील पावसाने तलाव भरला आहे. तलावाला कुठेही सुरक्षा कठडे किंवा बॅरीगेट्स लावलेले नाहीत. अनेकजण फोटो, रील काढण्यासाठी तटबंदीवर उभे राहून, पाण्यात पाय सोडून जीव धोक्यात घालत आहेत. त्यांना रोखणारे किंवा सावधानतेचे आवाहन करणारे सुरक्षा रक्षक नाहीत. तटबंदीलगत दारूच्या बाटल्या, गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या, जागोजागच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, पिशव्या पडलेल्या आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तलावाची सुरक्षा, स्वच्छता करणे गरजेचे आहे.
दिवेघाटाजवळच्या वडकी नाला परिसरातील तलाव सध्या निसर्गाच्या विविध रुपांचे दर्शन घडवत आहे. यामुळे बहरलेल्या निसर्ग सौदर्यांच्या दर्शनासाठी पर्यटक, प्रेमी जोडपी तलावाकडे येत आहेत. तलाव सध्या पर्यटकांसाठी धोकादायक झाला आहे. तलावाची तटबंदी जमिनीच्या बरोबर आलेली आहे.
कोणतेही सुरक्षा कठडे उभारलेले नाहीत किंवा बॅरिगेट लावलेले नाहीत त्यामुळे उत्साहात हुल्लडबाजी करणारे, रील्स बनवणारे तलावात पडू शकतात. उत्साहाच्या भरात अनेकजण तटबंदीवर उभे राहतात. तेथे अनेक पोझिशनमध्ये फोटो काढत असतात. अशावेळी पाय घसरून किंवा तोल जाऊन ते पाण्यात पडू शकतात.
याअगोदरही अनेक निष्पापांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. तटबंदीच्या दोन्ही बाजूंनी रस्ता असून तेथे अनेक वाहनचालक आपल्या दुचाकी, चारचाकी वाहने कशाही पद्धतीने लावतात. काहीजण धोकादायक पद्धतीने वाहने चालवत फोटो सेशन करतात. अशावेळी दुर्घटना होऊन प्राणहानी होऊ शकते. तलावावर शासकीय सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक प्रेमीयुगले अश्लील चाळे करतात.
तटबंदीलगत बसून अनेकजण मद्यप्राशनाचा येथेच्छ आनंद घेत असतात. प्रशासनाने मस्तानी तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच दुर्घटना होऊ नये यासाठी पावले उचण्याची गरज आहे. कमीत कमी सुरक्षारक्षक हुल्लडबाज, मद्यपीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.




