पुणे – राम नदी पुनरुज्जीवन मंगळवारपासून

पुणे – रामनदीचे संवर्धन करण्याच्या हेतूने विविध संस्थांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “इंटरनॅशनल डे ऑफ ऍक्‍शन फॉर रिव्हर्स’च्या निमित्ताने घोषित करण्यात आलेल्या राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आरंभ दि. 4 जून रोजी सायंकाळी 4 वाजता भुकुम येथील खाटपेवाडी तलाव येथे होणार आहे, अशी माहिती किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष माधव चंद्रचुड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रकल्पाविषयी विचारविनिमय आणि राम नदी खोऱ्याचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. सुमारे 4 ते 5 टप्प्यांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या कार्यक्रमासाठी महापौर मुक्‍ता टिळक, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि.चे मॅनेजिंग डायरेक्‍टर आणि सीईओ आर. आर. देशपांडे उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. यावेळी वसुंधरा स्वच्छता अभियानचे अनिल गायकवाड, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर, सागर मित्र आणि जलबिरादरीचे विनोद बोधनकर, इकॉलॉजिकल सोसायटीचे डॉ. गुरुदास नूलकर, जलदेवताचे शैलेंद्र पटेल, मिशन ग्राउंड वॉटरच्या वैशाली पाटकर, ओकिऑसच्या केतकी घाटे, धर्मेंद्र चव्हाण, जयप्रकाश पराडकर, ज्योती पानसे आदी उपस्थित होते.

रामनदी पुनरुज्जीवन एक कृती कार्यक्रम आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, तज्ज्ञ, सुमारे 35 महाविद्यालयांमधील हजारो इको रेंजर्स, पुण्यातील 3 किर्लोस्कर कंपन्या आणि स्थानिक नागरिक यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात पुणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी केले.

असा आहे रामनदीचा प्रवास
मुळशी तालुक्‍यातील वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकुम, भुगाव, बावधन, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्‍वरवाडी, बाणेर, औंध या मार्गाने ही नदी मुळा नदीला मिळते. भुकुम, भुगाव आणि बावधन अशा 3 ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर असून बावधन ते औंध हा भाग पुणे महानगर पालिका क्षेत्रात येतो. सुमारे 18 किलोमीटर लांबीच्या “रामनदी’ची अवस्था अत्यंत बिकट आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.