Pune: लाडकी बहीण योजनेसाठी अर्जांचा पाऊस

पुणे – राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांकडून अर्ज दाखल करण्याकरिता गर्दी होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३४ हजार ४९८ महिलांनी अर्ज केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
अर्ज दाखल करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यात येत आहे. आतापर्यंत प्रत्यक्ष अर्ज सादर केलेल्या महिलांची संख्या ८९ हजार ९७ आहे. तर ऑनलाइन अर्ज केलेल्या महिलांची संख्या ४५ हजार ४०१ आहे, अशी माहिती झेडपीच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी जामसिंग गिरासे यांनी दिली.
या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे. एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ होणार असून एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असल्यास दोघींनाही लाभ मिळेल. योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास १५ वर्षांपूर्वीचे शिधापत्रिका, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या पैकी एक ग्राह्य धरण्यात येणार आहे.





