Pune : पावसाचा जोर कमी ढगाळ वातावरणाचा खेळ

पुणे – शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून दिवसभर ऊन-ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कमाल तापमानातही वाढ झाल्याने उकाडा काहिसा वाढला आहे. बुधवारी (दि. २५) शहरातील कमाल तापमान ३० अंशांच्या पुढे नोंदले गेले.
शहरात आज दिवसभरात पावसाने उघडीप दिली, उपनगरांतील पाषाण परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. मात्र, जिल्ह्यातील भोर, मुळशी, आंबेगाव आणि मावळ परिसरात पावसाच्या एक ते दोन सरी पडल्या. दिवसभरात भोर येथे सर्वाधिक २० मिमी पावसाची नोंद झाली.
तर कुरवंडे येथे १५, गिरीवन परिसरात १० मिमी पाऊस झाला. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. आकाश सामान्यत: ढगाल राहील तर पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
घाट विभागाला आॅरेंज अलर्ट…
पुणे शहरात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज असला तरी जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील ४८ तासासाठी पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाचा आॅरेंज अलर्ट आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटसह अन्य घाट व डोंगरमाथ्यावर पर्यटनासाठी जाणारे पर्यटक आणि गावांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले.





