pune rain: पावसाचा जोर ओसरला, विश्रांतीची शक्यता
Pune rain:

pune rain: शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर आज दुपारनंतर कमी झाला. सततच्या संततधारेमुळे जलमय झालेल्या रस्त्यांवरून पाण्याचा निचरा झाल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुढील २४ तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवत हवामान विभागाकडून यलो अलर्ट दिला आहे.
मागील आठवडाभरापासून पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. मात्र, आता पाऊस काहीशी विश्रांती घेण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पुढील काही दिवस पुणेकरांना संततधारेपासून सुटका मिळेल.
मंगळवारी (दि. ७) दिवसभरात शिवाजीनगर परिसरात सर्वाधिक २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. लोहगाव परिसरात १५ मिमी आणि एनडीए येथे १६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज पावसाचा वेग आणि तीव्रता दोन्ही कमी होते. धरण क्षेत्रातील आवक आणि नद्यांची पाणी पातळी सध्यातरी नियंत्रणात असून, रात्री उशीरापर्यंत शहरात पावसाच्या अधून-मधून हलक्या सरी पडत होत्या.
खडकवासला धरण ९० टक्के भरले
खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्री जोरदार पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस पानशेत धरणांच्या परिसरात २५८ मिमी एवढा झाला. वरसगावला २४० मिमी, टेमघरमध्ये १९९ मिमी आणि खडकवासला येथे १०० मिमी पाऊस झाला. पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरण ९० टक्के भरले असून धरणातून कालव्यामध्ये ५०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी पाच वेळेत खडकवासला धरणात ३०, पानशेतला ६२, वरसगावला ६२ व टेमघरला ६० मिलिमीटर पाऊस झाला.
धरणातील पाणीस्थिती
धरण – पाणीसाठा(टीएमसी) – टक्के
खडकवासला – १.७५ – ८८.५२
पानशेत – ४.५६ – ४२.८७
वरसगाव – ५.०३ -३९.२५
टेमघर- ०.८६ – २३.३१





