पुणे – शहरातील खेळाडूंना बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सरावासाठी जाण्यास पुरेशा बस नसल्याने “पुण्यदशम’ बससेवेच्या दिवसातून आठ फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. महापालिकेच्या क्रीडा समितीत या प्रस्तावास मंजुरी दिली असून स्थायी समितीत हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागात ही सेवा सुरू आहे.
महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने शहरात “पुण्यदशम’ योजना सुरू केली आहे. यासाठी तिकीट किंमत 10 रुपये आहे. एका दिवसात कितीही वेळा प्रवास करण्यासाठी एकच तिकीट वापरले जाऊ शकते. मुख्य रस्त्यांवर दर पाच मिनिटांनी आणि अंतर्गत रस्त्यांवर दर पंधरा मिनिटांनी बस उपलब्ध आहे. त्याच धर्तीवर खेळाडूंसाठी बस सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार, नुकतीच महापालिकेत पालक संघटनेसोबत बैठक झाली.
यामध्ये पालकांनी बालेवाडीला जाण्यासाठी खेळाडूंना अडचणी येत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे ही योजना सुरू करा, अशी मागणी पालकांनी केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव क्रीडा समितीसमोर आणला होता. त्यानंतर क्रीडा समितीने त्यास मान्यता दिली. त्यानुसार स्वारगेट ते बालेवाडी, कात्रज ते बालेवाडी, पुणे स्टेशन ते बालेवाडी आणि शिवाजीनगर ते बालेवाडी अशा या बसच्या 8 फेऱ्या केल्या जातील. स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.