Pune : पुणे जिल्हा हा देशात अग्रेसर राहील; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास

पुणे : पुणे जिल्हा परिषदेने सामाजिक उत्तरदायित्त्व निधीतून (सीएसआर) केलेली कामे इतर जिल्ह्यांसाठी अनुकरणीय आहे. जिल्हा परिषदेचे शैक्षणिक गुणवत्ता विकास, आरोग्य संस्था बळकटीकरण आणि गुणवत्तापूवर्क सेवा पुरवण्यासाठी हाती घेतलेल्या पथदर्शी प्रकल्पाला सीएसआर निधीतून साथ मिळणार आहे. त्यामुळे पुणे जिल्हा हा देशात अग्रेसर राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित चॅम्पियन्स ऑफ चेंज सीएसआर ॲवॉर्ड 2025 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजाजन पाटील, प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, अनेक कंपन्या सीएसआरच्या माध्यमातून मदत करीत आहे. शासन, स्थानिक संस्था आणि कॉरपेट कंपन्या यांच्यातील त्रिसूत्री भागिदारी ही विकासाला गती देणारी आहे. त्यासाठी सीएसआर कंपन्यांना सिंगल विंडो आणि तत्काळ परवानगी देण्याचे सरकाने ठरविले आहे.
केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. तिथले काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी शासनाच्या निधीव्यतिरक्त दुसरा निधी गरजेचा असतो. तो देण्याचा प्रयत्न या कंपन्या करीत आहे. ही समाधानाची बाब आहे.




