पुणे : पुण्यातील उद्योजकाचा बिहारमधील पाटणा विमानतळावरून अपहरण करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. त्यांच्याशी मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या आमिषाने मेल आणि फोनद्वारे संपर्क साधण्यात आला होता. त्यांचा मृतदेह जोहानाबाद जिल्ह्यात रस्त्याकडेला आढळून आला आहे. लक्ष्मण साधू शिंदे (५५, डीपी रोड, कोथरूड) असे उद्योजकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांची खेडशिवापूरमध्ये सेंट्रिफ्युगल कास्टिंग बेअरिंग नावाची कंपनी आहे. त्यांच्याशी शिवराज सागी नावाच्या व्यक्तीने कास्टिंगबाबत फोन आणि ईमेलवर व्यावसायिक चर्चा केली होती. त्यानंतर त्यांना बिहारमधील पाटणा येथे चर्चेसाठी आमंत्रित केले होते. त्यावर विश्वास ठेवून ते ११ एप्रिल रोजी विमानाने पाटण्याला गेले. तेथे उतरल्यानंतर ते त्यांच्या मुलीशी फोनवर बोलले. त्यानंतर मात्र मुलीच्या मोबाइलवर काही टेक्स संदेश येऊ लागले. रात्री साडेआठ वाजता तिच्या व्हॉटसअपवर एक संदेश आला, मी आता झारखंडमध्ये १२०० फूट खाली असलेल्या प्लान्ट क्रमांक ३ मधील कोळसा खाणीत मशिन आणि टूल पाहण्यासाठी जात आहे. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोल इंडिया लिमिटेडचे येथे एकूण ७ प्लान्ट आहेत. त्यानंतर मात्र त्यांचा मुलीशी कोणताही संपर्क झाला नाही. यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी १२ एप्रिल रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार कोथरूड पोलिसांत दाखल केली. कोथरूड पोलिसांचे एक पथक पाटण्याला तातडीने तपासासाठी पाठविण्यात आले. तेथील विमानतळ पोलीस ठाण्यामधील स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने सीसीटीव्ही तपासले असता, लक्ष्मण शिंदे यांचे पाटणा विमानतळाबाहेरून अपहरण झाल्याचे आढळले. त्यानुसार तेथील विमानतळ पोलिसांत अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. तीन जिल्ह्यातील पोलिसांची शोधमोहीम तपासादरम्यान, नालंदा, गया आणि पाटण्यातील पोलीस पथकांनी जवळच्या गावांमध्ये शोधमोहीम राबवली आणि संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, १४ एप्रिल रोजी शिंदे यांचा मृतदेह बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातील घोसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याकडेला आढळला. या मोहिमेत कोथरूड पोलिसांचे पथकही होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी दिली. पैसे न दिल्याने खुनाची शक्यता आरोपींनी शिंदे यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याच्या आमिषाने पाटण्यात बोलावून घेतले. विमानतळावरूनच त्यांचे अपहरण करण्यात आल्यावर त्यांना शेतात, तसेच दुर्गम भागात नेऊन त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तसेच त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्यांनी ते न दिल्याने त्यांचा खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र, त्यांच्या मुलीला संदेशाद्वारे कोणतीही पैशांची झाली नव्हती. या प्रकरणाचा तपास पाटणा येथील विमानतळ पोलिसांकडून सुरू आहे.