पुणे : देशातील कचरा वेचकांना सामाजिक आणि आर्थिक सन्मान मिळावा, त्यांचे जीवनमान उंचावे आणि त्यांना सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने केंद्र सरकारच्या नमस्ते (नॅशनल अॅक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम) योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात पुण्यापासून करण्यात आली. केंद्र सरकारतर्फे अधिकृत नोंदणी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे फायदे या योजनेद्वारे कचरा वेचकांना मिळतील. यासाठी स्वच्छ संस्था, पुणे महापालिका आणि कष्टकरी पंचायत यांनी पुढाकार घेत पुण्यातील नोंदणी शिबिराला बुधवारपासून सुरुवात केली. कचरा वेचकांना आणि त्यांच्या कामाला नसलेली ओळख, असुरक्षित कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षायोजनांचा अभावाने मिळणारा लाभ यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो. ही योजना हे गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे आणि असंघटित कचरा वेचकांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या मुख्य प्रवाहात समावेशासाठी सक्ती करते. हा महत्त्वाचा टप्पा कचरा वेचकांच्याअदृश्य परंतु, अमुल्य योगदानाची अधिकृतपणे दखल घेईल आणि त्यांना अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि शाश्वत उपजीविकेसाठी सक्षम करेल. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, पंचायती राज मंत्रालय आणि पेयजल आणि स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ मार्फत या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. अर्बन मॅनेजमेंट सेंटर आणि युएनडीपी हे या उपक्रमाला तांत्रिक सहाय्य करीत आहेत. या योजनेची अंमलबजावणी करणारी पुणे महापालिका ही देशातील पहिली शहरी स्थानिक संस्था ठरली आहे. यामुळे कचरा वेचकांना सन्मानजनक आणि सुरक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आणि उपायुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागातील कार्यकारी अभियंता प्रसाद जगताप आणि मुकुंद बर्वे उपस्थित होते. सूत्रसंचालन कष्टकरी पंचायतचे आदित्य व्यास यांनी केले.