Pune: लोहगड किल्ला परिसरात जनजागृती

पुणे – युनेस्कोकडे प्रस्तावित जागतिक वारसा नामांकनासाठी लोहगड किल्ल्याची निवड झाल्याबद्दल श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचालित लोहगड विसापूर विकास मंचच्या वतीने जनजागृतीसाठी आज लोहगड किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाचे मार्गदर्शन लाभले.
सकाळी ९ वाजता कार्ला फाटा ते लोहगड पायथा भव्य दुचाकी रॅलीचे काढण्यात आली. भगव्या झेंड्यांनी सुसज्ज दुचाकींमुळे मार्गावर सर्वत्र शिवमय वातावरण निर्माण झाले होते. सकाळी १०.३० वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिववंदनेने महाराजांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवव्याख्याते धनंजय चंद्रात्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसे उभे केले, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. शिवरायांच्या मावळ्यांनी प्राणाची बाजी लावून हे गडकोट किल्ले उभे केले, त्याच्यावर हिंदवी स्वराज्य उभे राहिले असे हे ऐतिहासिक वैभव जतन करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन चंद्रात्रे यांनी केले.
या वेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मांडवरे, सहायक गटविकास अधिकारी थोरात, गणेश धानिवले, सरपंच सोनाली बैकर, पोपट दिघे, रमेश बैकर, सुभाष हुलावळे, सचिन भोरडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सचिन निंबाळकर आदींनी केले.



