Pune: सकल जैन संघातर्फे ठिय्या आंदोलन

पुणे : मुंबई येथील जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे, तसेच त्याच ठिकाणी पुन्हा मंदिर उभारावे, यांसह विविध मागण्यांसाठी सकल जैन संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
विलेपार्लेमधील जैन मंदिरांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करून पाडण्यात आले. त्यांच्या निषेधार्थ संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या वेळी सकल जैन संघाचे विजयकांत कोठारी, अचल जैन, मिलिंद फडे, महावीर कटारिया, अभय छाजेड, प्रवीण ओसवाल, प्रीती पाटील- जैन, सुजाता शहा, डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह मोठ्या संख्येने जैन बांधव आणि महिला हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या वेळी सकल जैन संघाने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना दिले.
“जय बोलो महावीर की”, ”हम शांत है पर कमजोर नही”, ”मंदिर तोडा चूप नही रहेंगे, शांतीसे मार्च करेंगे”,
“हम शांतीसे चलते है, अपनी बात करते है’, ”जय जयकार जैन धर्म की जय जयकार”, ”जैन धर्म अमर रहे” अशा घोषणा देत जैन समाजातील बांधवांनी मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.
विलेपार्ले येथील जैन मंदिर चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने पाडले. सर्व कायदेशीर बाबी समजून न घेता मुंबई महापालिकेने अत्यंत क्रूर पद्धतीने बुलडोझर व जेसीबीच्या सहाय्याने मंदिर उद्ध्वस्त केले, तसेच मंदिर पाडताना तेथील धार्मिक ग्रंथ, पूजा साहित्य यांची विटंबना करण्यात आली. प्रशासनाच्या या जुलमी कार्यामुळे देशातील समस्त जैन धर्मीय व समाज अत्यंत आक्रोशित झाला आहे, असे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.




