पुणे -साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नागरिक वाहन खरेदीला प्राधान्य देतात. पण, गेल्या चार दिवसांपासून पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे वाहन नंबर नोंदणीला अडचणी येत आहेत. त्यामुळे काही नागरिकांना गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर नवीन वाहन तर मिळेल पण, नंबरसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या मागणीसाठी संप सुरू केला आहे. हे कर्मचारी नसल्यामुळे आरटीओतील कामकाज ठप्प झाले आहे. परिवहन विभागाने काही सेवा ऑनलाइन केल्या असल्या, तरी अजून बऱ्याच सेवा ऑफलाइन असल्यामुळे नागरिकांना आरटीओमध्ये येऊनच त्यांची कामे करावी लागतात. आता संप सुरू असल्यामुळे कामे होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारवे लागत आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर नवीन वाहनांना नंबर मिळतो. पण, ग्राहकाने मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर त्या वेळेस आरटीओ कार्यालयात जाऊन ऑफलाइन नोंदणी करावी लागते. संपामुळे अशा नोंदणीला अडचणी येत आहेत. – महेश पाटील, डिलर्स वाहनांची नोंदणी ऑनलाइन असल्यामुळे संपाचा वाहन खरेदीवर काही परिणाम होणार नाही. नवीन वाहनांचा नंबर देखील ऑनलाइन मिळतो. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही. – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी