नवे बाधित अजूनही तीनशेच्या आसपास
करोनामुक्त होणाऱ्यांपेक्षा नवे बाधितही वाढलेलेच
पुणे – शहरात नव्या करोनामुक्त व्यक्तींपेक्षा नवे बाधित वाढताना दिसत आहेत. सध्या हवामान बदल आणि करोना नियमांकडे दुर्लक्ष, यामुळे बाधित संख्या अजूनही अडीचशे ते तीनशेच्या घरात आहे. दरम्यान, बुधवारी नव्याने 281 बाधित सापडले असून, 255 जण करोनामुक्त झाले आहेत.
आजचा करोनाबाधित दर 5.21 टक्के इतका असून, तो पुन्हा पाच टक्क्यांपुढे गेला आहे.
शहरात बुधवारी दिवसभरात 5 हजार 437 संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली. गेल्या 24 तासांत करोनामुळे 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये शहर हद्दीतील 7 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, आतापर्यंत 26 लाख 29 हजार 99 जणांच्या तपासणीमधून 4 लाख 76 हजार 493 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यातील 8 हजार 549 बाधितांचा मृत्यू झाला असून, 4 लाख 65 हजार 569 जण करोनामुक्त झाले आहेत.
शहरात सध्या सक्रिय बाधित संख्या 2 हजार 375 इतकी आहे. त्यामध्ये 331 जणांची प्रकृती चिंताजनक, तर 464 बाधित ऑक्सिजनवर आहेत.