पुणे : पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (वय ५५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. पोलीस निरीक्षक भोसले हे गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होते. भोसले पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. गुन्हे शाखेत नियुक्तीस असताना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गंभीर गुन्ह्याचा तपास करुन उलगडा करण्यात आला होता. कोंढवा पोलीस ठाण्यात ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्तीस होते. लोकसभा निवडणुकीत भोसले यांची पुणे शहरातून बदली करण्यात आली. ते छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात नियुक्तीस होते. तपासणीत ते कर्करोगाने ग्रस्त असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांची पुन्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. भोसले यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन झाल्याचे समजताच पोलीस दलात शोककळ पसरली. शोकाकुल वातावरणात भोसले यांच्या पार्थिवावर हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.