प्रभात वृत्तसेवा पुणे – आपल्याबरोबर आणलेली दागिन्याची पिशवी घाईगडबडीत रिक्षातून उतरताना तेथेच विसरली आणि हे लक्षात आल्यावर तिच्या डोळ्यासमोर अंधारून आले. बहिणीने विश्वासाने सुरक्षितपणे ठेवण्यासाठी दिलेले दागिने गडबडीने गेल्याचे लक्षात आल्यावर डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे दागिने हरवल्यावर बहिणीला काय उत्तर द्यावयाचे हे तिला सूचत नव्हते. त्यातूनही तिने आपल्याला सावरले आणि थेट वारजे पोलीस ठाणे गाठत आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी तात्काळ पावले उचलत अवघ्या तीन महिन्यांत दागिन्याची बँग शोधून काढले. हे पाहून या महिलेचे आनंदाश्रू अनावर झाले.सूरतमधील बहिणीकडून ही नांदेड सिटी येथील घरी परत येत होती. तिच्याजवळ बहिणीने विश्वासाने दिलेले दागिने होते. खासगी ट्रॅव्हल्सने येताना देहूरोड बायपासऐवजी चुकून ती नवले ब्रिज येथे उतरली. तेथून रिक्षाने वारजे येथे पोहोचली. सोबत लहान बाळ असल्यामुळे उतरताना गडबडीत आपल्या सोबत आणलेली दागिन्याची बॅग रिक्षात विसरली. घरी आल्यावर लक्षात आले की सोन्याचे दागिने असलेली बॅग रिक्षातच राहिली आहे. यावेळी रिक्षा निघून गेली होती, जवळ रिक्षाचा नंबरही नव्हता. आता जर ही बॅग मिळाली नाही तर काय, या विचाराने तिला रडू कोसळले. यानंतर आपणाला सावरत वारजे पोलीस ठाणे गाठले. आपल्यावर आलेला प्रसंग सांगितला. वारजे पोलिसांनी तातडीने पावले उचलत अवघ्या तीन तासांत बॅग शोधून काढली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले.पोलीस अंमलदार नंदकुमार चव्हाण, शिवाजी भोसले, माधव औताडे यांनी वारजे सर्व्हिस रोड ते नवले ब्रिजपर्यंतचा सीसीटीव्ही फुटेज तपासला. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर रिक्षाचा नंबर मिळाला. त्यानंतर नाकाबंदी ॲपमधून रिक्षाचालकाचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक शोधला. फोनवर संपर्क करून रिक्षा नवले ब्रिज येथे बोलावली. शोध घेतला तेव्हा रिक्षात मागच्या बाजूस ठेवलेली बॅग सुरक्षित होती. ही बॅग ताब्यात दिल्यावर महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला.साहेब… बहिणीचा संसार वाचवण्यासाठी तिची दागिने असलेली बॅग घेऊन आले. ही महत्त्वाची बॅग माझ्याकडून हरवली असती तर मी तिला काय उत्तर दिलं असतं…?, अशा शब्दांत या महिलेने वारजे पोलिसांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.