पुणे : पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणून कार्यरत असलेले पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण घाडगे यांना गंभीर अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांच्याविरोधात सेवेतून बडतर्फ करण्याची विभागीय प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. गोपनीय चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, चौकशीत प्रवीण घाडगे यांनी आपल्या पदाचा आणि पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करून एका वादग्रस्त बिल्डरला मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. संबंधित बिल्डरचा आंदेकर टोळीशी थेट संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण घाडगे यांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करत सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या बिल्डर अविनाश पवार याला जमीन वादाच्या प्रकरणात मदत मिळावी, यासाठी हा दबाव टाकण्यात आला होता. मात्र, एसीपी शंकर खटके यांनी कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार देत हा प्रकार थेट पोलिस उपायुक्त निखिल पिंगले यांच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान, जमीन वादाच्या एका प्रकरणात काही तक्रारदार पुणे पोलिस आयुक्तालयात अविनाश पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. तक्रार दाखल होऊ नये म्हणून अविनाश पवार याने तक्रारदारांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ‘स्टॅनली’ नावाचा व्यक्ती मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे समोर आले असून, त्याचा थेट संपर्क प्रवीण घाडगे यांच्याशी असल्याचे तपासात उघड झाले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने स्टॅनली याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत स्टॅनलीने धक्कादायक खुलासा करत प्रवीण घाडगे यांनी प्रकरण मिटवण्यासाठी आणि तडजोडीसाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. तसेच आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार याचे प्रकरण स्वतः प्रवीण घाडगे यांच्याकडे नेल्याची कबुलीही दिली. एका बाजूला पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आंदेकर टोळीविरोधात कठोर कारवाई सुरू असताना, पोलिस दलातीलच एक कर्मचारी त्या टोळीच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. तपासात यापूर्वीही प्रवीण घाडगे यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याचे समोर आले असून, ते पोलिस आयुक्तांच्या नावावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणे निकाली काढण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप होता. पीआरओ पदाचा गैरवापर करून अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सातत्याने सहभाग आढळल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेत प्रवीण घाडगे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा: MIM चा मोठा विजय! भाजप, राष्ट्रवादीला धक्का; ‘या’ नगरपरिषदेवर नगराध्यक्षासह १६ नगरसेवक निवडून आणले