Pune Police Commissioner : काही दिवसांपूर्वी गजा मारणेला येरवडा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्याला सांगलीच्या कारागृहात पाठविण्यासाठी पोलीस व्हॅन सांगलीच्या दिशेने निघाली. पण व्हॅन कारागृहात जाण्यापूर्वी साताऱ्यातील एका ढाब्यावर थांबली. तिथे पोलिसांनी गजा मारणेसोबत मटन पार्टी केली. या घटनेची गांभीऱ्याने दखल पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली आणि संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मारणे टोळीला दणका दिला आहे. मारणे टोळचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील अन्य सदस्यांच्या गाड्या कारवाईत पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी मारणे टोळीच्या १० ते १५ गाड्या जप्त केल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मारणे टोळीच्या गाड्या जप्त केल्या आहेत. मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील अन्य सदस्यांच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन टोयोटा फॉर्च्यूनर, एक महिंद्रा थार, एक टाटा नेक्सन या महागड्या गाड्यांसह आणखी ४ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच काही दुचाकी देखील पोलिसांनी कारवाईत जप्त केल्या आहेत. नेमकं काय घडलं होतं? गेल्या काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंड गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगलीच्या कारागृहात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्याला पोलिसांच्या व्हॅनमधून सांगलीच्या दिशेने नेण्यात आले. मात्र, वाटेतच साताऱ्यातील एका ढाब्यावर त्याच्यासोबत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मटन पार्टी केली. यानंतर ढाब्यावर मारणेला भेटण्यासाठी दोन फॉर्च्युनर आणि एका थार गाडीने तीन व्यक्ती आल्या होत्या. यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्तांनी याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधिकारी व कर्चमाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलीस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते हे मारणेला भेटायला आले होते. त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.