Pune: फायद्याच्या आमिषाने खिसे रिकामे; शहरात वाढते गुन्हे

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा ५ टक्के देण्याचे आमिष दाखवून एकाची ५७ लाख ३४ हजार २६० रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी प्रथमेश संजय भिलारे (वय २७), वसंत साधू मोहोळ (रा. दत्तवाडी) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात उमेश यशवंत पासलकर (वय ४१, रा. सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना २१ जानेवारी २०१९ ते १६ फेब्रुवारी २०२३ दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी भिलारे आणि मोहोळ यांनी फिर्यादी उमेश पासलकर यांना शेअर मार्केट पैसे गुंतवणूक केल्यास दरमहा ५ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून ५७ लाख ३४ हजार २६० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक फडतरे तपास करत आहेत.
व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिषाने महिलेची ३० लाखांची फसवणूक : याप्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनुज कुमार बाबूराम (वय ४७, रा. पोरवाल रस्ता, लोहगाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना डिसेंबर २०२२ ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अनुज कुमारने फिर्यादी महिलेला स्मॅशर्स अरेना या नावाने बॅडमिंटन कोर्ट, कॅफे, योगा स्टुडिओ आणि स्पोर्ट मटेरियल शॉप सुरू करणार असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना या व्यवसायात प्रॉफिट शेअरिंग भागीदार करून घेण्याचे आमिष दाखवून ३० लाख २८ हजार ३०८ रुपये घेतले. यानंतर आरोपी अनुजकुमार याने कुठलेही कागदपत्रे, हिशोब न देता दिलेल्या पैशांचा अपहार करून स्मॅशर्स अरेना स्पोर्ट्स अकेडमी स्वतःच्या ताब्यात ठेवून फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार तपास करीत आहेत.




