* महाराष्ट्रातील पहिला रिजनल ज्वेलरी ब्रँड
* पीएनजी-गाडगीळ कुटुंबातील सर्वांत तरुण व सर्वांत मोठी कंपनी
पुणे : भारतातील आघाडीची रिटेल ज्वेलरी कंपनी पीएनजी सन्स (पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि)ने एक अब्जपेक्षा अधिक डॉलरच्या किमती एवढ्या उलाढालीचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच, अशी कामगिरी करणारा महाराष्ट्रातील रिजनल रिटेल ज्वेलरी क्षेत्रातील पहिलाच ब्रँड आहे.
कामगिरीबाबत कंपनीचे संचालक-सीईओ अमित मोडक म्हणाले, ‘कंपनीचे संस्थापक अजित गाडगीळ आणि डॉ. रेणू गाडगीळ यांनी कंपनीच्या टीमवर विश्वास दाखविला आहे. त्यामुळेच आव्हानात्मक परिस्थितीत कंपनीची विक्री व मार्जीनबाबतची कामगिरी उत्तम झाली आहे. परिणामी पीएनजी गाडगीळ कुटुंबातील सर्वांत तरुण व सर्वंत मोठी कंपनी बनली आहे.’
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीला ११५ कोटी रुपयांचा करपश्चात निव्वळ नफा अपेक्षित आहे. गेल्या आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये कंपनीला १०३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीची उलाढाल १० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली असून, यात सुमारे ३२०० कोटी रुपयांचा दागिने व सुमारे ६९०० कोटी रुपयांचा बुलियनचा वाटा आहे.
दागिने विक्रीत ३२ टक्के वाढ झाली असून, रिटेल ज्वेलरी क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत ही सर्वांत चांगली कामगिरी म्हणावी लागेल. कंपनीच्या बुलियन व्यवसायाबाबत मोडक म्हणाले, ‘सोने खरेदीचा अनुभव, आर्थिक क्षमता व उत्तम वितरण व्यवस्थापना क्षमतेमुळे २०२१-२२ मध्ये आम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि विक्रीत गेल्या आर्थिक वर्षात ७५ टक्के वाढ झाली आहे.’
‘सोन्याच्या भावातील वाढ व ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन डिझायनर व लाइटवेट ज्वेलरी सोने व हिऱ्यांमध्ये लाँच केली. त्यामुळेच विक्री व अन्य उद्दिष्ट साध्य करणे शक्य झाले. वर्किंग वुमनची गरज लक्षात घेऊन कंपनीच्या प्रवर्तकांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये गार्गी हा फॅशन ज्वेलरीचा ब्रँड लाँच केला आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ असे मोडक यांनी नमूद केले.