पुणे – पीएमपी बससेवेचा विस्तार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीपर्यंत करण्याचा निर्णय पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुमटा) बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी नियोजित विकास आराखड्यात पीएमपी बस डेपोंसाठी आरक्षणे प्रस्तावित करण्याबरोबरच अन्य सुविधा पुरवण्यासाठी पीएमआरडीएने नियोजन करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत. सध्या “पीएमआरडीए’ हद्दीत जिल्ह्यातील सुमारे 840 गावांचा समावेश आहे.
पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासोबतच वाहतूकविषयक विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. याची चौथी बैठक बुधवारी अध्यक्ष व विभागीय आयुक्त राव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, महाराष्ट्र मेट्रो रेलचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम्, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे उपस्थित होते.
मेट्रोचाही आढावा
नवीन मेट्रो मार्ग महामेट्रो कॅरिडोर 1 मधील निगडी-कात्रज, चांदणी चौक-वाघोली, हिंजेवाडी-शिवाजीनगर, शिवाजीनगर-हडपसर, हिंजेवाडी-चाकण, तर महामेट्रो कॅरिडोर 2 मधील वारजे-स्वारगेट, वाघोली-हिंजवडी, चांदणी चौक-हिंजवडी प्रस्तावित मार्गाबाबत आढावा बैठकीत घेण्यात आला.