पुणे – शहरातील खासगी वाहनांचा आकडा 30 लाखांच्या वर गेला असल्याने तसेच शहरातील रस्ते खासगी वाहनांच्या वर्दळीला अपूरे पडत असल्याने पीएमपीची सेवा अधिक सक्षम करून प्रवासी संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच पीएमपीची प्रवासी संख्या गेल्या गेल्या वर्षभरात तब्बल दोन लाखांनी घटल्याची माहिती समोर आली आहे. पीएमपी प्रशासनाने एप्रिल 2022 ते मार्च 2023 या वर्षातील प्रवाशांची आकडेवारी जाहीर केली असून, महिन्याला सरासरी 8 लाख 738 प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केला असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत पीएमपीकडून प्रवासी संख्या सरासरी 10 ते 11 लाख असल्याचे प्रत्येक वर्षी ढोबळ मानाने कागदोपत्री दाखविण्यात येत होते. त्यामुळे, पुणेकरांकडून सार्वजनिक वाहतूकीला प्राधन्य देण्यात येत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आधार
पीएमपीकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी पाहता, पीएमपीला महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थांच्या आधार असल्याचे चित्र आहे. शैक्षणिक वर्ष जून ते ऑगस्ट मध्ये सुरू होते. तर मार्च ते एप्रिल मध्ये संपते. याच महिन्यांच्या कालावधीत पीएमपीच्या प्रवाशांचा आकडा 8 लाखांच्या वर गेला आहे तर उर्वरीत कालावधीत प्रवासी संख्या सात ते आठ लाखांच्या दरम्यान आहे. दिवाळीच्या कालावधीतही पीएमपी प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे या आकडेवारीतून समोर येते.
प्रवासीकेंद्रित सेवा नसल्याचा फटका
गेल्या काही वर्षात पीएमपीची सेवा प्रवासी केंद्रीत नसल्याचा फटका प्रवासी संख्येला बसल्याचे चित्र आहे. त्यात, प्रामुख्याने प्रवाशांना वेळेत बस न मिळणे, प्रवाशांची संख्या कमी असणे, पीएमपीच्या तिकिटांचे तसेच फेऱ्यांचे संयोजन नसणे, बसची धाव वेळेत नसणे, वाहतूक कोंडी, प्रवाशांना उभे राहण्यासाठी बस थांबे नसणे, खासगी प्रवासी वाहनांच्या तुलनेत प्रवाशांना तिकिट दर तसेच इतर सवलती नसणे याचा फटका बसत असल्याचे प्रवासी संघटनांचे मत आहे.