पुणे -पीएमपी बसेसचे लाइव्ह लोकेशन, बस किती वेळेत थांब्यावर येणार अशी सर्व माहिती प्रवाशांना आता गूगल मॅपवर दिसणार आहे. ही सेवा पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर दि.19 जानेवारीपासून सुमारे 20 बसमध्ये सुरू केली जाणार आहे. त्यानंतर सर्व तांत्रिक बाबी व माहिती संकलित झाल्यानंतर उर्वरित सर्व बस गूगल मॅपवर लाइव्ह दिसणार आहेत.
पीएमपी बस वेळेत येत नाही, बस स्थानकावर बस थांबत नाही अशा तक्रारी प्रवाशांकडून नेहमी येतात. पण, पीएमपी व गुगल यांच्यात करार झाल्यानंतर पीएमपीच्या बसचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांना दिसणार आहे. त्याच्यावर पीएमपीकडून काम सुरू आहे. त्यासाठी सर्व प्रकारच डेटा संकलित केला जात आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी आयटीएमएस सिस्टिम, (लॅटलॉंग) बस थांब्याचे लोकेशन दाखविणारी यंत्रणा अशा गोष्टींवर काम सुरू आहे. त्यासाठी शहरात पीएमपीचे थांबे किती आहेत, याची माहिती गोळा करण्यात आली आहे. पीएमपी व संबंधित यंत्रणांनी बहुतांश माहिती गोळा झाल्यानंतर आता प्रायोगिक तत्वावर पीएमपी बस गूगल मॅपवर लाइव्ह दिसणारी सेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठी 19 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे.
पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर 20 बस गूगल ट्रॅकिंगवर सुरू करणार आहोत. त्यानंतर सर्व डेटा गोळून मे 2023 पर्यंत सर्व बस गुगलवर प्रवाशांना दिसतील, अशी सोय केली जाणार आहे. सध्या सर्व डेटा गोळा करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे.
– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी