PUNE: पीएमपी अधिकारी अॅक्शन मोडवर; पीएमपी संचलन सुधारण्यासाठी प्रत्येक मार्गावर तपासणी होणार

पुणे – बस मार्गावरी सर्व स्टाॅपवर थांबते का, चालक व वाहक नियमांचे पालन करतात का, प्रवाशांना चांगली सेवा मिळते का यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची पाहणी करून पीएमपी बसचे संचलन व्यवस्थित चालते का? त्यातील त्रुटी काय याबाबतची पाहणी आता स्वत: डेपो व्यवस्थापकांमार्फत होणार आहे. विशेषत: व्यवस्थापकांनी संचलनात फिरून या बाबी तपासायचा असल्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष संजय कोलते यांनी दिले.
पीएमपी अधिकारी आता अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येते. त्याच पार्श्वभूमीवर पीएमपीचे संचलन सुधारण्यासाठी आणि त्यातील त्रुटी जाणून दूर करण्यासाठी प्रत्येक डेपो व्यवस्थापकाने दोन शिफ्टमध्ये मार्गावर फिरणे आवश्यक आहे. त्याशिवाय समस्या समजणार नाहीत, या दृष्टीकोनाचून संजय कोलते यांनी हे आदेश दिले आहेत. पीएमपीचे शहरात एकूण १५ डेपो आहेत. या डेपोमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालते.
सोमवार ते शुक्रवार या दरम्यान दररोज प्रत्येक शिफ्टमध्ये डेपो व्यवस्थापकाला त्यांच्या डेपोच्या हद्दीतील मार्गावर फिरून पाहणी करावी लागणार आहे. यावेळी प्रवाशांच्या तक्रारी ऐकून त्या सोडविण्याचे प्रयत्न डेपो मॅनेजरला करावे लागणार आहेत. त्या बरोबरच वाहक व चालकांकडून नियमांचे पालन केले जाते का या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. त्यांच्या पाहणीचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागणार आहे.
डेपो दत्तक घेण्याची सूचना
पीएमपीचे माजी व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी अधिकाऱ्यांना डेपो दत्तक देऊन प्रत्येक शनिवारी मार्गावर फिरण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा खूपच चांगला फायदा दिसून आला होता. आता डेपो मॅनेजर प्रत्यक्ष मार्गावर फिरणार असल्यामुळे पीएमपीच्या संचालन सुधारून प्रवाशांना फायदा होईल, अशी शक्यता आहे.





