Pune : पीएमपी ठेकेदारांना उत्पन्न वाढीचे टार्गेट

पुणे – पीएमपी ताफ्यात ठेकेदाराच्या नवीन बस दाखल झाल्या आहेत. त्यानंतरही प्रवासी संख्या वाढलेली नसून, स्व-मालकीच्या बस उत्पन्नापेक्षा ठेकेदारांच्या बसचे उत्पन्न तुलनेने कमी आहे. त्यामुळे पीएमपी अध्यक्षांनीच आता ठेकेदारांना प्रवासी, उत्पन्न वाढीच्या सूचना दिल्या आहेत. एवढच नव्हे तर प्रवासी, उत्पन्न वाढवा आणि बक्षिस मिळवा असे आवाहनही पीएमपीने केले आहे.
पीएमपी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात प्रवासी सेवा देते. दिवसाची प्रवासी संख्या जवळपास दहा ते बारा लाख एवढी आहे. सध्या पीएमपी ३८१ मार्गांवर १६०० ते १७०० बसच्या माध्यमातून सेवा देते. प्रवासी संख्येनुसार मार्गावर बस सोडण्याचे नियोजन करून बस सोडण्यात येत आहे.
पीएमपीच्या ताफ्यात अलीकडेच खासगी ठेकेदारांच्या ३३० सीएनजी बस दाखल झाल्या आहेत. मात्र, त्यांची जूनमधील उत्पन्नाची सरासरी पीएमपीच्या मालकी बसपेक्षा कमी आहे.
नव्याने दाखल झालेल्या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर धावतात. स्वमालकीच्या बस जुन्या असूनदेखील उत्पन्न मात्र खासगीपेक्षा जास्त देत आहेत. त्यामुळे ठेकेदारांच्या चालकांकडून होत असलेल्या चुका सुधारून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावा, जुलैमध्ये ही वाढ दिसून आली पाहिजे, अशा सूचना पीएमपीने ठेकेदारांना दिल्या आहेत.
काय करावे…
– मार्गावरील प्रत्येक थांब्यावर बस थांबवावी
– प्रवाशांशी साैजन्याने वागावे
– हात केल्यावर गाडी थांबवावी
उत्पन्न वाढीवर भर
तिकीट दरवाढीनंतर पीएमपीने प्रवासी आणि दैनंदिन उत्पन्न वाढीवर भर दिला आहे. त्यासाठी आगार प्रमुखांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस मार्गावर फिरण्याची सक्ती केली आहे. यामुळे दैनंदिन उत्पन्न वाढत आहे. शिवाय जे चालक, वाहक जास्त उत्पन्न आणतील, त्यांना १५ ऑगस्ट रोजी बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
‘संचलन तोटा कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक मार्गावरील चालक, वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत.’ सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी.





