पुणे : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा तीव्र आहे त्यामुळे पिण्याचे पाणी जपून वापरा. तसेच, १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पुरेल असे नियोजन करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच, जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन जिल्हा परिषदा यांनी प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देऊन पाण्याची सद्यःस्थिती जाणून घेण्याच्या व टंचाई असलेल्या भागात तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही शिंदे यांनी दिले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत प्रशासनाने डोळ्यात तेल घालून पाणीटंचाईला तोंड देण्याच्या आणि नियोजनबद्ध पद्धतीने पावले टाकून काम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात किती टँकर्स सुरू आहेत आणि गेल्या वर्षी काय परिस्थिती होती, याचाही आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात काही ठिकाणी पाण्याची टंचाई उद्भवली असून, येणाऱ्या दोन महिन्यांत प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि बीडीओ, तहसीलदार, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सातत्याने फिल्डवर संपर्क ठेवून आपापल्या भागातल्या टंचाईचा सर्व्हे करावा व योग्य ती पावले तातडीने उचलावी. ज्या जिल्ह्यांनी कृती आराखडा सादर केला नाही त्यांनी दोन-तीन दिवसांत सादर करावा, असे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तात्पुरत्या नळयोजनांना तसेच तलावांत चर खणण्याच्या कामाला गती द्यावी. पाण्याचा अवैध उपसा थांबवला पाहिजे. लघु प्रकल्पातून वारेमाप उपसा होणार नाही हे पाहणे गरजेचे आहे. पाण्याचे प्रमाण कमी झाले की, स्त्रोत दूषित होऊ शकतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ते तपासण्याची गरज आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत पिण्याचे पाणी वाहून नेणारे टँकर्सदेखील चांगले आणि स्वच्छ असावेत. त्यांच्यावर जीपीएस लावावे म्हणजे त्यांचा दुरूपयोग टळेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.