पुणे -कसबा पोटनिवडणुकीत भाजप आणि नव्या शिवसेनेने जोरदार प्रचार केला. मंत्री आणि कार्यकर्त्यांची फौज उतरवली. मात्र, “ठराविक’ आणि विशेषत: पेठांमधील मतदारांना “गृहित’ धरणे भाजपच्या अंगलट आल्याचे निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. हेमंत रासने यांच्या रुपाने कसब्यातील हा पराभव भाजपला हादरा देणारा आहे. गेल्या 28 वर्षांत गिरीश बापट यांनी कसब्याची एकहाती बांधणी केली. त्यामुळे ही निवडणूक तशी प्रतिष्ठेचीच. प्रचारासाठी “सर्व’ यंत्रणा कामाला लावण्यात आली होती. थेट देवेंद्र फडणवीस हेदेखील पुण्यात तळ ठोकून होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही “रोड शो’ केला होता. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही “ओंकारेश्वर’ दर्शनाने कसबा पोटनिवडणुकीचा अप्रत्यक्ष प्रचार केलाच. मात्र, भाजपचे हे सर्व प्रयत्न अपुरे ठरले आहेत. सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठेतील काही मते ही पारंपरिक व्होटबॅंक यावेळी भाजपला तारू शकली नाही. फक्त शनिवार पेठ आणि कसबा पेठेच्या काही भागांतच रासने यांना चांगले मतदान झाले. तर, उर्वरित पेठांमध्ये मात्र धंगेकर यांनी सुरुवातीपासून “लीड’ कायम ठेवली. “बापट फॅक्टर’ ठरला महत्त्वाचा कसबा विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे बाजीराव रस्त्याच्या पूर्वेला आणि पश्चिमेला असे दोन भाग गृहित धरले, तर पश्चिमेकडील मतदारांनी भाजपला सदैव साथ दिली. तर, पूर्वेकडील मतदार हा कॉंग्रेसचा आधार राहिला आहे. पण, हे सर्व असतानाही गिरीश बापट यांनी मागच्या अडीच दशकांपैक्षा जास्त काळात मतदार आणि कार्यकर्त्यांची “वीण’ घट्ट बांधली होती. या पोटनिवडणुकीत स्वत: बापट प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांना मानणारा वर्गही विभागला गेला. त्याचा फायदा धंगेकर यांना झाला असावा, असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.