पुणे – राज्य सरकारच्या निर्देशानुसार सध्या शहरात कुटुंब पाहणी सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील सर्व क्षेत्रीय कार्यालये, दवाखान्यांअंतर्गत 300 हून अधिक परिचारिकांच्या मदतीने माहिती संकलनाचे काम सुरू आहे. मात्र, शहरातील अनेक उच्चभ्रू सोसायट्या माहिती देण्यास सहकार्य करत नसल्याने सर्वेक्षणात अडचणी येत आहेत. दर वर्षी दि. 1 एप्रिल ते 15 जून या कालावधीत सर्वेक्षण केले जाते. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती, गर्भवती महिला, शून्य ते पाच वर्षे वयाची बालके, 30 वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांबद्दलची माहिती, कुटुंबनियोजन साधने याची माहिती घेतली जात आहे. लहान-मोठ्या वस्त्या, झोपडपट्टी परिसर अशा ठिकाणचे सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आले आहे. ते पूर्ण होताच पालिका आरोग्य विभागाकडे सादर केले जाणार असून, त्यातून शहराच्या प्रत्यक्ष लोकसंख्येच्या आरोग्याची माहिती संकलित होणार आहे, असे प्रशासनाने सांगितले. काही कुटुंबांकडून चांगली वागणूक… या परिचारिका माहिती संकलनासाठी घरोघरी जात आहेत. त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही कुटंब मात्र या कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देत आहेत. त्यांनी माहिती लिहून घेतल्यानंतर चहा-पाणी किंवा सरबत याबाबतही विचारपूस केली जाते, असेही अनुभव काही आरोग्य सेविकांनी सांगितले. परिचारिका म्हणतात… “सर्वेक्षण वेळेत पूर्ण करायचे आहे, परंतु शहरातील काही “सो कॉल्ड एलाइट क्लास’ समजणाऱ्या सोसायट्या आम्हाला प्रवेश देत नाहीत. काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली जाते. तसेच व्यवस्थित, संपूर्ण माहिती दिली जात नाही. काही ठिकाणी तर माहिती देणेच टाळले जाते आणि दार लावून घेतले जाते. यामुळे थोडे वाईट वाटते,’ असे अनेक अनुभव परिचारिकांनी सांगितले आहेत. संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्वेक्षणातील माहिती अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करावे. – डॉ. वैशाली जाधव,सहायक आरोग्य अधिकारी, मनपा