पुणे : महापालिकेत ठेकेदारांकडून सुरक्षा विभागात नेमलेल्या २२८ सुरक्षा रक्षकांना मार्च महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाही. महापालिकेने मे इगल सिक्युरिटी ॲंड पर्सोनल सर्व्हिसेस प्रा. लि. या ठेकेदाराला दोन दिवसांच्या आत वेतन देण्याची नोटीस महापालिका प्रशासनाने बजाविली आहे. या कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या तक्ररीनुसार, ही नोटीस बजाविण्यात आल्याची माहिती सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेत दरवर्षी १५६५ सुरक्षा रक्षकांसाठी निविदा काढली जाते. गेल्या वर्षी ही निविदा तीन ठेकेदारांमध्ये विभागातून देण्यात आली होती. या ठेकेदारांना प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत गेल्या महिन्यातील पगार करणे बंधनकारक आहे. एवढ्या मोठ्या संख्येने एकाच कंपनीकडून सुरक्षा रक्षक घेतल्यानंतर त्या एजन्सीची काम करून घेताना तारांबळ उडत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी तीन कंपन्यांना सुरक्षा रक्षकांची निविदा वाटून देण्यात आली होती. त्यातील इगल या कंपनीने २२८ कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दिलेले नाही. आता एप्रिल महिनाही संपला आहे. त्यामुळे दोन महिन्यांचे वेतन कामगारांना न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या २२८ सुरक्षा रक्षकांमध्ये ५० टक्के महिला आहेत, तर जवळपास १५ तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे. इगल कंपनीकडे २२८ सुरक्षा रक्षकांच्या वेतनाची जबाबदारी आहे; पण त्यांना नोटीस बजावून, दंड करूनही कर्मचाऱ्यांचा पगार केलेला नाही. या कंपनीचे अधिकारी आमचा फोनही घेत नाहीत. त्यामुळे ३ मे पर्यंत पगार जमा न झाल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई प्रस्तावित केली जाईल अशी नोटीस बजावण्यात आली आहे. – राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी महापालिका