Pune : २२ कोटी दोन दिवसांत भरा

पुणे : महापालिकेचा मिळकतकर थकविल्याच्या प्रकरणी करआकारणी व संकलन विभागाकडून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला थकबाकीची नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतर दोन दिवसांच्या आत मिळकतकर न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे. ही थकबाकीची रक्कम सुमारे २२ कोटी ६ लाख रुपयांची आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून देण्यात आलेल्या नोटिसीनुसार, पुणे पेठ, एरंडवणा येथील लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावावर ही मिळकत असून, या मिळकतीची थकबाकी २७.३८ कोटी होती. याप्रकरणी फाउंडेशनकडून हॉस्पिटल धर्मादाय असल्याने मिळकतकर माफ करण्याची मागणी करत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने सुनावणी घेताना ‘सर्वसाधारण कराच्या’ रकमेत ५० टक्के सवलत देत उर्वरित रक्कम भरण्याचे आदेश फाउंडेशनला दिले होते.
महापालिकेच्या नोटिसीनुसार न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने २०१४ ते २०२५ या कालावधीत एकूण २२.०६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणावर महापालिका आयुक्तांच्या दालनात बैठक झाली असून, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व) यांच्या उपस्थितीत मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्याचे तोंडी आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे दोन दिवसांच्या आत थकबाकी भरली नाही, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही फाउंडेशनला देण्यात आला आहे.




