Pune : जिल्ह्यातील पाणंद, शेतरस्ते होणार मोकळे

पुणे : अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी रस्त्याअभावी अनेकदा अडचणी येतात. तर काही पाणंद रस्ते, शेत रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत पाणंद, शेतरस्ते होणार मोकळे करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार पुढील तीन महिन्यांत जिल्ह्यातील शेतरस्ते खुले करण्यात येणार आहेत. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणंद, शेतरस्ते ग्रामस्थांच्या सहकार्याने सामंजस्याने खुले करण्यात येणार आहे.
शेती क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता आहे. हे लक्षात घेता शेतकामे करताना यंत्रांचा उपयोग वाढला आहे. यामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे करण्यासाठी, यंत्रसामग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतीमाल बाजारात पोहचविण्यासाठी बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असते. तसेच कुटुंबाचे विभाजन होत असलेल्याने शेतीचेही विभाजन होत आहे. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी-कमी होत असल्यामुळे शेतकरी यांचा कल त्यांचे शेतातून सुरू असलेली वहिवाट काही शेतकरी बंद करतात. त्यामुळे सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वहिवाट रस्ते, ग्रामीण रस्ते, खुले करण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत.
त्यामुळे रस्ते खुले करण्यासाठी काही कालावधीचे आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर असे रस्ते कालबद्ध रस्ते खुले करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, येत्या मार्च अखेरपर्यंत रस्ते खुले करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. या बाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी, भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी, पोलिसांना दिल्या आहेत.
शेतरस्ते, पाणंद रस्ते खुले करण्याची कार्यपद्धती
– पाणंद रस्ते निश्चितीसाठी तलाठी गाव नकाशे भूमि अभिलेख विभागाकडून उपलब्ध करून घेणार
– तलाठी प्रत्यक्ष भेट देऊन बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करणार
– बंद असलेले रस्ते ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जातात, त्यांची यादी तयार करणार
– असे रस्ते खुले करण्यासाठी सरपंच, शेतकरी यांची बैठक आयोजित करून समन्वयाने व सर्वसहमतीने रस्ता खुला करण्यासाठी प्रयत्न करणे
– जर रस्ते खुले होत नसल्याने पोलिसांच्या सहाय्याने रस्ते खुले करणे
– रस्ते खुले न झालेल्या प्रकरणांमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 व महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अर्ज घेऊन पुढील कार्यवाही करणे




