pune palkhi : पालखी सोहळ्यात प्रथमच एआय चा वापर
pune palkhi :

बंदोबस्तासाठी सात हजार पोलीस, फेस रेक्गनिजेशन कॅमेरे वापरणार-पोलीस आयुक्त
pune palkhi : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम पालखी सोहळ्याचे गुरुवारी (९ जुलै) शहरात आगमन होणार आहे. पालखी सोहळ्यात सात हजार पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात राहणार असून यंदा पालखी मार्गावर कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित (एआय) सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात येणार आहेत, तसेच फेस रेक्गनिजेशन कॅमेरे, ॲडव्हान्स व्हिडीओ ॲनलटिक्स कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, संजय पाटील, तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी केली आहे. यावेळी अमितेशकुमार म्हणाले, पालखी मार्ग, मुक्कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून त्यांची पालखी सोहळ्यावर नजर असेल. पालखी सोहळा सुरक्षित पार पडावा, यादृष्टीने बंदोबस्ताची आखणी केली आहे. सोहळ्यातील प्रत्येक घडामोडींवर कॅमेऱ्यांची नजर असेल. आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाशी हे कॅमेरे जोडले आहेत. त्याच्या मदतीने वाहतूक, गर्दीचे व्यवस्थापन होईल.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन गुरुवारी बोपखेल येथे होईल. विश्रांतवाडीमार्गे पालखी, शिवाजीनगर, गणेशखिंड रस्ता, नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ, लक्ष्मी रस्तामार्गे श्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी जाईल. श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा जुना मुंबई-पुणे रस्तामार्गे शहरात येईल.
नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिरात पालखी मुक्कामी जाईल. यावेळी होणारी भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन दागिने हिसकावणे, मोबाइल संच हिसकावण्याच्या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गस्त घालणार आहेत.
चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून मार्गावरील प्रमुख चौकात बंदाेबस्त असेल. मुक्कामी दर्शनासाठी महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था (रांग) आहे. बाँम्ब शोधक नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दलाची पथके (क्युआरटी) तैनात करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्याच्या माहिती देण्यासाठी यंदाही लाईव्ह लोकेशनलिक पोलिसांकडून समाज माध्यमात दिली जाईल, पालखी मार्ग, तसेच मुक्कामी पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पालखी सोहळ्याचे आगमन, प्रस्थान सोहळा सुरळीत पार पडावा, यादृष्टीने पालखी सोहळ्याचे प्रमुख, विश्वस्त, दिंडी प्रमुखांशी संवाद साधण्यात आला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
पोलीस मदत केंद्र
– नाना पेठ पोलीस चौकी
– पालखी विठोबा मंदिर
– निवडुंग्या विठोबा मंदिर
– रामाेशी गेट चौक, भवानी पेठ
– संत कबी चौक, नाना पेठ
दृष्टीक्षेपात पालखी बंदोबस्त
– चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, १३ उपायुक्त, ३० सहायक आयुक्त
– १८२ पोलीस निरीक्षक, ५७० उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक,
– सहा हजार ५५२ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या
– १२५० गृहरक्षक दलाचे जवान, क्यूआरटी १२ पथके
– सहा बाॅम्ब शोधक नाशक पथके पालखी मार्गावर
– पालखी सोहळ्यावर अत्याधुनिक कॅमेऱ्यांची नजर
– गर्दीचे नियोजन करण्यावर विशेष लक्ष
– गैरप्रकार, चोऱ्या रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पथके





