Pune : ९० हजारांवर ग्राहकांची बत्ती गुल

पुणे : आंबेगाव (ता. मुळशी) येथे लागलेल्या आगीमुळे शनिवारी (दि. २२) दुपारी १२.४४ वाजता महापारेषणच्या पिरंगुट- कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाब टॉवर लाइनमध्ये ट्रिपिंग आले होते. त्यामुळे हिंजवडीमधील २०० आयटी उद्योगांसह हिंजवडी, वाकड, पिरंगुट, भुकूम, भुगाव, पौड, मुठा खोरे, कोळवण खोरे आदी परिसरातील घरगुती, व्यावसायिक व इतर सुमारे ९० हजार २०० ग्राहकांचा वीजपुरवठा ४३ मिनिटे बंद होता.
आंबेगाव येथील टेकड्यांच्या परिसरात आज लहान- मोठ्या झाडाझुडपांना आग लागली होती. या ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या पिरंगुट- कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या टॉवर लाइनखाली ही आग पसरल्यानंतर या लाइनमध्ये ट्रिपिंग आले. परिणामी महावितरणच्या पिंपरी विभागातील १३ व मुळशी विभागातील १८ अशा ३१ उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला व वीजयंत्रणेत १८२ मेगावॅटची तूट निर्माण झाली.
यामुळे हिंजवडी फेज १ ते ३ मधील २०० आयटी उद्योग, तसेच वाकड परिसर, पिरंगुट, भुगाव, भुकूम, उरावडे, कासारआंबोली, पौड, मुठा खोरे, कोळवण खोरे, लवळे, कोठावडे आदी परिसरातील ९० हजार घरगुती, व्यावसायिक व इतर ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. महापारेषणच्या वरिष्ठ अभियंत्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दुरुस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर ४३ मिनिटांनी या सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचे महापारेषणच्या वतीने सांगण्यात आले.




